गुरुवार, 23 अप्रैल 2009

ठोंबरे

बालकवींच्या मृत्युनंतर कवी सदानंद रेगे यानी लिहिलेली कविता इथे देत आहे. या कवितेची पार्श्वभुमी थोडक्यात सांगतो. त्र्यंबक बापुजी ठोम्बरे म्हणजेच बालकवी हे रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या घरी आश्रीत म्हणुन रहात. लक्ष्मीबाई टिळकांचे व त्यांचे नाते स्पष्ट करणारी ही कविता कवीने लक्ष्मीबाईच्याच भुमिकेतुन लिहिली आहे.

ठोम्बरे

ठोम्बरे तसा भोळसटच होता
स्वभावानं राणीच्या रुपायासारखा लख्खं, खणखणीत
देव्हार्‍यातला देवच जसा
शामळुशेट शाळीग्राम
पहावं तेव्हा त्याला भुत डसलेलं असायचं
दिवेलागण झाली की माझं बापडीचं एकच काम
“ठोम्बरे, ये बाबा…….”
मग ठोम्बरे यायचा
आणि लक्षुमबाई मिठमोहर्‍यांनी त्याची द्रिश्ट काढायच्या
टिळकांना सांगीतलं की म्हणत
“तु कशाला लागतेस त्या भुताच्या पाठीस
That could be a holy ghost!”

एक दिवस ठोम्बरे मला म्हणाला
“आई, आज मन दुखतय सारखं सकाळपासनं”
मला वाटलं नेहमीचाच वात्रटपणा चाललाय त्याचा
मी पोळी लाटुन तव्यावर घातली
तो म्हणाला “खरचं आई, तुमच्या गळ्याशप्पथ”
मी म्हटलं “मेल्या, मी मेले तर तुझं रे काय जाणारे?”
तो म्हणाला “मग, मी… मी जातो मरुन”
मी म्हटलं “तेवढं मात्र नको करुस
मला रडायला वेळ नाही
दुपारी मला सांडगे घालायचेत
आणि संध्याकाळी….
टिळकांशी भांडायचय”

तव्यावरची पोळी परतत होते
तेव्हा माझ्या कानाशी लागुन तो म्हणाला
“आई, माझ्या मनात एक औदुम्बर उगवतोय
त्याचा ठणका लागलाय सारखा”
मी त्याच्यासारखाच हेल काढीत म्हटलं,
“छान, आता टिळक आणि तु
दोघे त्याच्यावर जाऊन बसा
चव्वीस तास
खाली येऊच नका
नाहीतर असं करा
तुझा तो औदुम्बर आकाशाला लागला
की त्याची फुलं आण
तुझ्या फुलराणीला वेणी करु आपण”
तो म्हणाला, “छान कल्पना आहे
खरचं छान, Good ! Excellent !
वेणी For फुलराणी !
My फुलराणी!”

बोलता बोलता तो धुम रुळावरुन धावतच सुटला
मी ओरडतेय, “ठोम्बरे, थांब…..
असा वेड्यासारखा धावतोयस काय”
पण तो धावतच होता….
निर्झरासारखा धावत होता
तुळशीच्या पांदीतुन तो मला दिसत होता
अखेर तो एक ठिपका झाला
नी आकाशात कुठं दिसेनासा झाला

टिळक रात्री उशीरा घरी आले
तेव्हा त्यांच्या पिशवीत मातीने बरबटलेल्या
वहाणांचा जोड होता
मी कुणाचा म्हणुनही नाही विचारलं
म्हटलं, “असेल एखाद्या होली घोस्टाचा
आपल्याला कशाला पंचाईत?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें