गुरुवार, 23 अप्रैल 2009

ठोंबरे

बालकवींच्या मृत्युनंतर कवी सदानंद रेगे यानी लिहिलेली कविता इथे देत आहे. या कवितेची पार्श्वभुमी थोडक्यात सांगतो. त्र्यंबक बापुजी ठोम्बरे म्हणजेच बालकवी हे रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या घरी आश्रीत म्हणुन रहात. लक्ष्मीबाई टिळकांचे व त्यांचे नाते स्पष्ट करणारी ही कविता कवीने लक्ष्मीबाईच्याच भुमिकेतुन लिहिली आहे.

ठोम्बरे

ठोम्बरे तसा भोळसटच होता
स्वभावानं राणीच्या रुपायासारखा लख्खं, खणखणीत
देव्हार्‍यातला देवच जसा
शामळुशेट शाळीग्राम
पहावं तेव्हा त्याला भुत डसलेलं असायचं
दिवेलागण झाली की माझं बापडीचं एकच काम
“ठोम्बरे, ये बाबा…….”
मग ठोम्बरे यायचा
आणि लक्षुमबाई मिठमोहर्‍यांनी त्याची द्रिश्ट काढायच्या
टिळकांना सांगीतलं की म्हणत
“तु कशाला लागतेस त्या भुताच्या पाठीस
That could be a holy ghost!”

एक दिवस ठोम्बरे मला म्हणाला
“आई, आज मन दुखतय सारखं सकाळपासनं”
मला वाटलं नेहमीचाच वात्रटपणा चाललाय त्याचा
मी पोळी लाटुन तव्यावर घातली
तो म्हणाला “खरचं आई, तुमच्या गळ्याशप्पथ”
मी म्हटलं “मेल्या, मी मेले तर तुझं रे काय जाणारे?”
तो म्हणाला “मग, मी… मी जातो मरुन”
मी म्हटलं “तेवढं मात्र नको करुस
मला रडायला वेळ नाही
दुपारी मला सांडगे घालायचेत
आणि संध्याकाळी….
टिळकांशी भांडायचय”

तव्यावरची पोळी परतत होते
तेव्हा माझ्या कानाशी लागुन तो म्हणाला
“आई, माझ्या मनात एक औदुम्बर उगवतोय
त्याचा ठणका लागलाय सारखा”
मी त्याच्यासारखाच हेल काढीत म्हटलं,
“छान, आता टिळक आणि तु
दोघे त्याच्यावर जाऊन बसा
चव्वीस तास
खाली येऊच नका
नाहीतर असं करा
तुझा तो औदुम्बर आकाशाला लागला
की त्याची फुलं आण
तुझ्या फुलराणीला वेणी करु आपण”
तो म्हणाला, “छान कल्पना आहे
खरचं छान, Good ! Excellent !
वेणी For फुलराणी !
My फुलराणी!”

बोलता बोलता तो धुम रुळावरुन धावतच सुटला
मी ओरडतेय, “ठोम्बरे, थांब…..
असा वेड्यासारखा धावतोयस काय”
पण तो धावतच होता….
निर्झरासारखा धावत होता
तुळशीच्या पांदीतुन तो मला दिसत होता
अखेर तो एक ठिपका झाला
नी आकाशात कुठं दिसेनासा झाला

टिळक रात्री उशीरा घरी आले
तेव्हा त्यांच्या पिशवीत मातीने बरबटलेल्या
वहाणांचा जोड होता
मी कुणाचा म्हणुनही नाही विचारलं
म्हटलं, “असेल एखाद्या होली घोस्टाचा
आपल्याला कशाला पंचाईत?

बुधवार, 22 अप्रैल 2009

सुख म्हणजे नक्की काय असतं

"एका लग्नाची गोष्ट" या नाटकातलं श्रीरंग गोडबोले यांचं हे गाणं मला फार आवडतं

मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं

देव देतो तेव्हा, छप्पर फाडून देतो
हवयं, नको ते म्हणणं, प्रश्नच नसतो
आपण फक्त दोन्ही हात, भरुन घ्यायचं नुसतं
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ....

दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता, थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्त घेताना, लाजायचं नसतं

मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं

संसार से भागे फिरते हो

काल आपली होळी-धुळवड झाली. पण राजकारणातल्या धुळवडीला नुकती कुठे सुरुवात झाली आहे. हळुहळू एकेक रंग आणि ढंग बाहेर येतील. चिखलफेक सुरु असतेच, तिला आणखी जोर येईल. एकीकडे जागतिक मंदीच्या भोवर्‍यात सापडलेले आम्ही आणि दुसरीकडे अक्कल सोडुन दुसरी कुठलीही मंदी माहीत नसलेले राजकारणी. आदीमानवाच्या काळात देखील काढले गेले नसतील ईतके माणसाच्या संस्कृतीचे वाभाडे आता काढले जातील आणि तेही so called Self-declared संस्कृती-रक्षकांकडुन. मन विषण्ण करणार्‍या या परिस्थितीत आधार देतात ती काही गाणी. डोकं सुन्न झालयं, कुठलाही विचार मनामध्ये येत नाहीयें. डोळ्यांना दिसतयं पण जे दिसतयं त्याचं आकलन होण्यासाठी लागणारी विचार्-बुद्धी गमावुन बसलो आहे. आणि अशा निष्काम अवस्थेमध्ये गाणं कानावर आलं...

संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे
ईस लोक को तो अपना ना सके, उस लोक में भी पछताओगे

साहीर लुधीयानवी. साहीर समाजवादी होता. म्हणजे नक्की काय होता. मी लहानपणा पासुन संघ-विचारात वाढलेला. घरी-दारी संघाचे विचार. संघाचे असे विचार - जे डॉक्टरांना अजिबात अभिप्रेत नव्हते. हे मला नंतर डॉक्टरांचे चरित्र वाचल्यानंतर उमगले. समाजवाद - ही एक शिवी असल्यासारखे त्याचे उच्चारण. कालांतराने समाजवादी पार्टी आणि तीचे नेते यांनी आपल्या वर्तनाने "समाजवाद" ही खरोखरच एक शिवी बनवली. पण डॉ. राम मनोहर लोहीया यांना अभिप्रेत असलेला समाजवाद हा वेगळा होता. आणि साहीर पक्का लोहीयावादी. मला अजुनही"माझ्या आजुबाजुच्या काही "थोर" मंडळीच्या चर्चा आठवतात. जे जे उत्तम (म्हणजे आमच्या बाल-बुद्धीला आवडलेलं, भावलेलं) ते सर्व साहित्य किती बोगस, फालतु आहे हे आमच्या मनावर ठसविण्याची जणु अहमहमिकाच लागलेली असे. पु.लं. - समाजवादी, कुसुमाग्रज - समाजवादी, पाडगावकर - समाजवादी अशी सगळी जंत्री होती. "या लोकांनी फक्त समाज सुधारण्याच्या गप्पा माराव्यात. खरी काठ्या खाण्याची वेळ येते ना तेव्हा आम्हीच असतो. हे xx समाजवादी xxला पाय लावून पळत सुटतात" अशी मुक्ताफळं सतत कानावर येत. एकीकडे मी पु.लं. चा हरीतात्या वाचत असायचो, रावसाहेब वाचत असायचो. वाचता वाचता त्या व्यक्ती आणि वल्ली माझ्या डोळ्यासमोर मुर्तीमंत उभ्या असायच्या. कुसुमाग्रजांची "कणा" वाचुन कुठेतरी अंगावर काटा उभा राहीलेला असायचा. "वेडात मराठे विर दौडले सात" वाचुन (आणि नंतर ऐकुन) मुठी वळत असायच्या. पाडगावकरांची "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" वाचुन आयुष्यातले छोटे छोटे आनंद पण कसे उपभोगावे याची मनातल्या मनात प्रॅक्टीस करत असायचो. आणि त्याचवेळी हे सगळे आनंद ज्यांनी मिळवून दिले त्या जनकांबद्दल असे कटु उद्गार स्वतःच्या नाही पण मित्रांच्या जनकांकडून ऐकावे लागायचे. चिमुकल्या डोक्यात परस्परविरोधी विचारांचे रणकंदन माजलेले असायचे. एकीकडे आईचे उपास-तापास, व्रत-वैकल्य चालू असायची. हिंदु धर्म आणि त्याचे कायदे, शिष्टाचार, चाली-रिती, त्या धर्मातला माझा विशिष्ट भाषा बोलणारा समाज, त्या समाजाचे स्वत:चे कायदे, शिष्टाचार, चाली-रिती, त्या समाजातली माझी जात आणि त्या जातीचे स्वत:चे कायदे, शिष्टाचार, चाली-रिती, आणि मी - एक माणुस. माझी स्वतःची एक जिवन-पद्धती, स्वतःचे काही नियम. किती आणि काय म्हणुन भान ठेवायचे ?

यह पाप है क्या, ये पुण्य है क्या, रितोंपर धर्म की मोहरें है
हर युग में बदलतें धर्मोंको, कैसे आदर्श बनाओगे

सत्ययुगात म्हणजे श्रीरामाच्या युगातला धर्म, जो आपण आज खरा हिंदु धर्म मानतो त्याला श्रीकृष्णाच्या द्वापारयुगात कितीसं महत्व होतं ? स्वतः श्रीकृष्णाने क्षत्रिय कुलात जन्म घेतला, यादव कुलात त्याचं पालन-पोषण झालं हे सर्वांना माहित असलेलं सत्य असताना यज्ञाला बसताना "मी ब्राह्मण आहे" असे सांगीतले. अर्जुनाला उपदेश करताना धर्माचा खरा अर्थ समजावला. त्या भगवतगितेला आज आपण आपला धर्मग्रंथ मानतो. असा हा युगपरत्वे बदलणारा धर्म. मग या कलीयुगातच त्या धर्माचं एवढं अवडंबर का ? माझ्या मनाला पटलेल्या मार्गाने जगायला अडथळा करणारी माणसं नक्की कोणत्या धर्माचं पालन करतात ? मुळात त्यांना ही धर्मपालनाची ठेकेदारी दिलीच कुणी ? आणि जर ते स्वयंघोषीत ठेकेदार आहेत तर मग त्यांना त्यांची जागा दाखवणारे शासन आम्हाला का मिळत नाही ? मुळात देव ही एक कल्पना आहे. प्रत्येकाला त्याच्या देवाचा साक्षात्कार वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो हे का मान्य केले जात नाही ?

यह भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो
अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे

एका गाण्याच्या स्पर्धेला मी श्रोता म्हणून गेलो होतो. मध्यंतरात मी स्पर्धकांना भेटण्यासाठी म्हणुन त्यांच्या खोलीत गेलो. बरेचसे स्पर्धक - ज्यांची गाणी गाउन झाली होती - ते निकालाच्या चिंतेने चिंतातुर चेहर्‍याने बसले होते. त्यातल्या काहींशी मी बोललो. त्यांना " छान झालं हा गाणं" अश्या प्रोत्साहनपर कॉम्प्लीमेंटस दिल्या. त्यांनीही हसुन आभार मानले. त्यातच एक जण होता, तो चटकन म्हणाला " तुम्हाला माहीती तरी आहे का मी कोणतं गाणं म्हटलं ते ?" मी म्हटलं "हो. आणि हे ही माहिती आहे की ही स्पर्धा आयत्या वेळेस गाणे म्हणण्याची असूनही वादकांनी फक्त तुमच्याच गाण्याला अतिशय सुरेख साथ केली होती." त्यावर तो म्हणाला " नाही, काही लोकांना सवय असते तोंडावर गोड बोलायची. देखल्या देवा दंडवत असा प्रकार असतो. म्हणून म्हटलं" मला त्याच्या बोलण्याचा राग आला नाही, वैषम्य वाटलं. ज्या माणसाची आपली यापुर्वी ओळखदेख नाही, यापुढेही ज्याचा आपला काही संबंध येण्याची शक्यता नाही. ज्याला आपल्याशी चांगलं बोलल्याने काहीही फायदा होणार नाही असा माणूस जर आपल्याला चांगलं बोलत असेल तर आपल्या मनात संशय का निर्माण व्हावा. शहरामध्ये येणारे परदेशी पाहुणे कधी कधी अकारण आपल्याकडे बघुन "स्माईल" देतात. त्यात आपल्यालाही काही गैर वाटत नाही. याउलट ट्रेनमध्ये आपल्या समोरच्या बाकावर बसलेला आपला (अनोळखी) भारतीय बाधव आपल्याकडे बघुन हसला तर आपली पहीली प्रतिक्रिया काय असते ? आपल्यापैकी कितीजण त्या हास्याला उत्तर म्हणून चटकन प्रतिहास्य करु शकतील ? आपल्या मनात संशय-कल्लोळ सुरु होतो. मेंदु आठवणींच्या फाईली उकरायला लागतो. हा माणुस कोण ? तो मला ओळखतो पण मी त्याला कसा ओळखत नाही ? तो माझ्याकडे बघुन का हसला असेल ? माझ्या तोंडाला काही लागलं तर नाही ? एक ना दोन , हजारो शंका आपल्या मनात घोंगावायला लागतात. माणसाने माणसाकडे बघुन हसणे ही एवढी गंभीर गोष्ट आहे ? कारण काय आहे, आपल्या वाट्याला येणारे हे छोटे छोटे आनंद उपभोगण्याची आपली मानसिक तयारीच नसते. वर्षानुवर्षे आपण "भोग वाईट, त्याग चांगला" हेच बाळकडु स्वतःही प्यालेलो असतो आणि पुढे आपल्या मुलांनाही पाजणार असतो. जैन धर्मामध्ये एक पर्युषण पर्व असतं. ४० दिवसांचा उपवास. आणि हा उपवास करणार कोण ? तर बहुसंख्य लहान मुलं - त्यातही मुलींची संख्या जास्त. ज्यांना अजुन जगाची काही माहिती नाही त्यांना अशा प्रकारे वेठीला धरणारे, त्याग शिकवणारे तुम्ही कोण ? केवळ ते तुमच्यावर अवलंबुन आहेत म्हणुन तुम्ही त्यांचं आयुष्य तुमच्या पद्धतीने घडवणार. ख्रिश्चन धर्मात मुलींना नन बनवले जाते. माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार धर्माच्या नावाखाली हिरावून घेतला जातो. आणि विशेष म्हणजे कोणीही याला अंधश्रद्धा मानत नाही. ज्या देवाने या सृष्टीत सौंदर्य घडवलं त्यानेच कुरुपताही घडवली. आपण ज्या सुखसोयींचा आस्वाद घेतो त्या ईतरांना नाकारण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला ?

हम कहतें है ये जग अपना है, तुम कहतें हो झुठा सपना है
हम जनम बीताकर जायेंगे, तुम जनम गवांकर जाओगे

फक्त तिन कडव्यात साहीर किती गोष्टी सांगुन जातो. पाडगावकरांचं एक बोलगाणं आहे - "यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही " अशी मांणसं पावला पावलाला भेटतात. कुठल्याही चांगल्या गोष्टीशी यांचं वैर असतं. टी.व्ही. वरची काही चॅनेल्स अशा माणसांनी सतत भरुन वाहत असतात. २४ तास ही माणसं एकच गोष्ट सांगत असतात " जे जग मिथ्या आहे. संसार माया आहे. आपण या मायेच्या जंजाळातुन बाहेर पडायला पाहीजे." हे आणि यासारखे असंख्य. यातले काही ह.भ.प. अगदी तरुण म्हणजे ३०-३५ चे असतात. मला सांगा, हे सगळं शिकवायला यांनी आयुष्याचा किती अनुभव घेतला आहे ? छान कपडे घालुन, ए.सी. रुममधे बसुन प्रवचन द्यायचं आणि शिकवायचं काय तर "मायेच्या पाशातुन बाहेर पडले पाहीजे". ज्यांचे विचार आणि कृती यांचा ताळमेळ नाही त्यांना "धर्मगुरु" का मानायचे ?

संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे